‘सुधाकररावांच्या कार्याचा राज्यकर्त्यांना विसर’
जलसंधारण क्षेत्रात माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी राज्यात भरपूर कामे केल्यानंतरही राज्यकर्त्यांना त्यांच्या कार्याचा विसर पडला आहे. संत सेवालाल महाराज यांचा संदेश आणि सुधाकरराव नाईक यांचे जलसंधारणाचे कार्य पुढे नेले असते तर आज जलक्रांती प्रयोग राज्यात नव्हे तर देशात चर्चिला गेला असता, असा विश्वास आमदार मनोहरराव नाईक यांनी व्यक्त केला आहे.
पोहरादेवी येथे सेवालाल युनिटच्या उद्घाटनपर कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. आमदार नाईक म्हणाले, जलसंधारण मंडळाचे अध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री असताना सुधाकरराव नाईक यांनी ‘सर्वप्रथम वाहते पाणी चालवायला शिका, चाललेले पाणी थांबावयाला शिका आणि थांबलेले पाणी जिरवा’ असे सांगितले होते. यासाठी त्यांनी विशेष तरतूद केली होती. जलसंधारणाची ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’सारखी कामे हाती घेणारे महाराष्ट्र त्यावेळेस देशातील एकमेव राज्य होते. उद्याच्या पाणीटंचाईची बाब सुधाकररावांनी फार पूर्वीच ओळखली होती. त्यांनी त्या क्षेत्रात कार्यही केले. पण, त्यांचे कार्य राज्यकर्त्यांनी पुढे नेले नाही. त्यामुळे वसंतराव नाईकांनी कृषिक्रांती आणली तशी जलक्रांती राज्यात येऊ शकली नाही. त्याचे परिणाम आज महाराष्ट्रासह संपूर्ण देश भोगत आहे. राज्यातील मराठवाडा आणि विदर्भात पाण्याचा दुष्काळ आहे. तर देशभरातील सात राज्ये दुष्काळाच्या झळा सोसत आहेत.
आंध्र प्रदेशचे मुख्यमत्री चंद्राबाबू नायडू यांनी नदीतील वाळू मोफत नेण्याच्यादृष्टीने निर्णय घेणे गरजेचे आहे. जोपर्यंत वाळू आणि गाळाचा उपसा नदीमधून होणार नाही तोपर्यंत नदीचे पात्र खोल होणार नाही. त्यामध्ये पाणी खेळणार नाही. जलसंधारणाची कामे करीत असतानाच राज्य सरकारने तातडीने मोफत वाळू देण्याचा निर्णय जाहीर केल्यास पुन्हा एकदा महाराष्ट्र पाणीदार बनेल, असेही नाईक म्हणाले.
यावेळी आमदार राजेंद्र पाटणी, माजी आमदार अनंतकुमार पाटील, माजी वीज मंडळ सदस्य अनिल राठोड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पवार यांनी तर आभार शंकर आडे यांनी मानले.
Click here. ...
BANJARA UNLIMITED STATUS VIDEO AND SONGS. ..
BTV Banjara youtube channel
0 comments:
Post a Comment